धुळे - जिल्ह्यात बुधवारी 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या 178 झाली आहे. एका 3 वर्षीय बालकाने आणि त्याच्या आईने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 21 झाला असून 92 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी 6 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण धुळे शहरातील रहिवासी आहेत. तर, बुधवारी एका तीन वर्षीय बालकाने तसेच त्याच्या आईने कोरोना वर मात केली असून, यामुळे आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे. 178 पैकी 92 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये मुंबई येथील रहिवाशांचा देखील समावेश आहे. तर, धुळे शहरातील शिवाजीनगर भागातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला असून सर्वाधिक रुग्ण या तालुक्यातील आहेत. बुधवारी दुपारी शिरपूर रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा धुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.