धुळे - जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी लागावी. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी शिवसेनेच्यावतीने शहरातील महादेवाचा अभिषेक करण्यात आला. तसेच शेतकऱ्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
यंदा संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. जुलै महिन्याची 15 तारीख उलटून देखील अद्यापही धुळे जिल्ह्यात पहिजे तसा पाऊस झालेली नाही. यामुळे शेतकरी राजा चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात विहिरींनी तळ गाठला असून अद्यापही काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाअभावी जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे वरूणराजाला साकडे घालण्यात आले. तसेच शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेच्यावतीने आग्रा रोडवरील प्राचीन महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. धुळे जिल्ह्यात दमदार पाऊस होऊ दे, शेतकरी राजाला चिंतेतून मुक्त कर, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.