धुळे - खरीप हंगामातील दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांना निवेदन देण्यात आले. अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन यात निष्कळजीपणा करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
यंदा संपूर्ण राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल केले आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी शासनाने खरीप दुष्काळी अनुदान जाहीर केले आहे. ते अनुदान त्वरित शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाला आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र, यात प्रशासन निष्काळजीपणा करत असून शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. बोंड अळीचे अनुदानही अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. २ वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम अजूनही आलेली नाही. खरीप हंगामातील दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ मिळाल्यास चालू खरीप हंगामासाठी त्यांना त्याची मदत होईल, हे अनुदान त्वरित मिळावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून याबाबत जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना त्वरित अनुदान न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.