धुळे - शहरात २० हजार रुपये किमतीची देशी बनावटीचे पिस्तूल, ८०० रुपये किमतीचे ४ जिवंत काडतूसे व २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून पिस्तूल शिरपरमार्गे विक्रीसाठी आणली जात होती. शिरपूर ग्रामीण पोलिसांनी वडेल शिवाराताली सीमा तपासणी नाक्यावर ही कारवाई केली.
शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मध्यप्रदेश येथील उमरटी येथून शिरपूरमार्गे एक व्यक्ती पिस्टल विक्रीसाठी दुचाकीवरून येत असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पाटील यांनी आपल्या पथकाला सीमा तपासणी नाक्यावर सापळा लावत कारवाईचे आदेश दिले. वाहनांची तपासणी करत असताना संशयास्पद दुचाकीस्वारास थांबवत झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ २० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, ८०० रुपये किमतीचे ४ जिवंत काडतूसे व २० हजार रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित सतनामसिंग महारासिंग जुनजा (वय - १९ रा. उमरटी जिल्हा बडवानी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने महामार्गावर ठिकठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यन्वित करण्यात आले आहे. याद्वारे घातपाताच्या उद्देशाने शहरात दाखल होणाऱ्या धारदार व प्राणघातक हत्यारांची तस्करी रोखण्यात येत आहे.