धुळे - शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. शहरातील साक्री रोडवरील 2 ठिकाणी चोरट्यांनी आपला हात साफ केला. यात एका ठिकाणी चोरट्यांनी चक्क पोलिसांच्या घरालाच लक्ष केले. यामुळे शहरात वाढत्या चोऱ्यांकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरातील साक्री रोड भागात असलेल्या पुखराज रामकरण वर्मा यांच्या श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी बेन्टेक्सचे दागिने आणि विविध राशींचे खडे असा ऐवज चोरून नेला. एवढेच नव्हे तर याठिकाणी राहणाऱ्या साई अपार्टमेंट मधील पोलीस कॉन्स्टेबल भिकाजी पाटील हे रात्री ड्युटी बजावण्यासाठी गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटाची तिजोरी फोडून तिजोरीतून 2 तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठ्या, 2 ग्रॅमची सोन्याची पट्टी आणि 4 ग्रॅम वजनाची रिंग असा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरटे अपार्टमेंटमध्ये घुसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
हेही वाचा - खळबळजनक! शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना काढले वर्गाबाहेर
पोलीस कॉन्स्टेबल भिकाजी पाटील हे तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रात्री ते मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी याठिकाणी नाका-बंदी करण्यासाठी गेले होते. तसेच त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असल्याने बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी हात साफ केला. शहरातील विविध ठिकाणी चोऱ्यांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढले असून सर्वसामान्य नागरिकां सोबतच आता चोरट्यांनी पोलिसांच्या घरांवर ही लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा तसेच रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलचरणी साकडे