धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तालुक्यात कोव्हीड सेंटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या सेंटरच्या रस्त्यावर चक्क मातीचा ढिग टाकून रस्ता बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील एका वसतिगृहात कोव्हीड सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यावर मातीचे ढिग टाकून संपूर्ण रस्ता बंद करण्याचा 'प्रताप' बघावयास मिळाला आहे. या मातीच्या ढिगाऱ्यामुळे कोव्हीड सेंटरला ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकेलादेखील अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शिरपूर प्रशासनाच्या वतीने शहरालगत असलेल्या शिंगावे येथील वसतिगृहात कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. आताची परिस्थिती बघता अर्थे येथील दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांना या कोव्हीड सेंटरला ठेवण्यात आले होते. तर, अर्थे येथील १०, खमोदे येथील ८ व्यक्तींना या कोव्हीड सेंटरला पाठवण्यात आले आहे. मात्र, शिरपूर शहर कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने काहिंनी कोव्हीड सेंटरकडे जाणाऱ्या रस्तावर चक्क माती मुरुमचा ढिग टाकून रस्ताच बंद करून टाकला आहे. या रस्त्यावरून १५-२० गावांचा समावेश येतो. या परीसरात तीन आरोग्य उपकेंद्रदेखील आहेत. या परिसरातील रग्णाला शहरात, रुग्णालयात जाण्यासाठी किंवा गरोदर मातेला शहरातील रुग्णालयामध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होईल. मात्र, माती टाकून रस्ताच अडवल्याने येथून रुग्णवाहिका किंवा कुठलेही चारचाकी वाहन निघणे कठीण होणार आहे. परिणामी रस्ता अडवण्याच्या या आडमुठेपणामुळे रुग्णांचा जीवदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या रस्त्यावर शिरपूर नगरपालिका असो किंवा प्रशासन असो सर्वांची रेलचेल आहे. मग हा ढिगारा येथून अद्याप का काढला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरातून आपत्कालीन प्रसंगावेळी रुग्णवाहिका गेली नाही तर रुग्णाला जीव गमवावा लागू शकतो. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत हा मातीचा ढिग रस्त्यावरून काढून टाकायला हवा आणि असे प्रताप करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.