धुळे - शिरपूर तालुक्यातील करवंद गावाजवळ अरुणावती नदीत वाळूचा उपसा सुरू आहे. हा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर काही संशयितांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या दोन तलाठ्यांवर जमावाने प्राणघातक हल्ला चढवला. या घटनेत तलाठी पंकज महाले आणि दारासिंग पावरा हे जखमी झाले. करवंद गावाजवळ अरुणावती नदीत वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही अधिकारी कारवाईसाठी गेले होते. संशयित आठ ते दहा जणांनी या दोघांना मारहाण केली व तेथून फरार झाले. हा प्रकार कळताच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी शिरपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वी वाळू वाहतूकदारांनी प्रांताधिकाऱ्यांना मारहाण केल्याने शिरपूर चर्चेत आले होते. वाळू तस्करांची मुजोरी वाढीस लागल्याचे बोलले जात आहे.