धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील एका रसायन कारखान्यात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास 2 बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दुपारी 3 वाजेपर्यंत 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 43 पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर शिरपूरच्या कॉटेज रुग्णालय तसेच धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेला तरुण विकास नारायण आटाळे हा या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्याने या घटनेची हकिकत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितली.
हेही वाचा - धुळ्याच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट; १५ ठार, ४८ गंभीर
विकास हा शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रहिवासी आहे. कारखान्यात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यात आग लागली. आवाजाने आम्ही घाबरून गेलो. सर्वत्र आगीत होरपळलेल्या लोकांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसल्याने मला चक्कर येऊ लागली. मी कसाबसा मुख्य दरवाज्याकडे पळत असताना माझी शुद्ध हरपली. त्यानंतर काय झाले? मी रुग्णालयात कसा आलो, हे मला काहीच माहिती नाही, अशी माहिती विकासने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
विकास हा या कारखान्यात उपहारगृहात मदतनीस म्हणून कामाला आहे. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. सकाळच्या सत्रात काम करणाऱ्या कामगारांना चहा बनवून देण्यासाठी जात असताना अचानक मोठा स्फोट झाल्याने विकास देखील जखमी झाला. त्याच्यावर शिरपूरच्या कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत जखमी झालेले कामगार प्रचंड भीती खाली आहेत. ते काहीही बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत.
हेही वाचा - धुळे केमिकल कंपनीच्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर
दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, कारखान्याच्या आजूबाजूला शेतांमध्ये काम करणाऱ्या काही महिला देखील मृत्युमुखी पडल्या आहेत. काही शेतमजुरांच्या झोपड्या देखील स्फोटामुळे आग लागून जळून खाक झाल्या आहेत. जनावरे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
मृतदेहांची ओळख पटवणे कठीण-
या स्फोटात ठार झालेल्या कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण आहे. कारण स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की काहींचे मृतदेह अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाले आहेत. आगीत जळाल्यामुळे मृतदेह नेमका कोणाचा आहे? हे ओळखणे अशक्य आहे. कामगारांच्या नातेवाईकांची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयात गर्दी झाली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती-
या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण अनेक जण गंभीर जखमी आहेत. अनेकांना तर शुद्ध नाही. गंभीर जखमींना त्वरित धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - धुळे केमिकल कंपनी स्फोटामुळे शिरपूर तालुका हादरला, जखमींवर उपचार सुरू
घटनेनंतर मदतकार्य सुरू-
या दुर्घटनेची माहिती होताच शिरपूर तालुक्यातील विविध गावातील लोकांनी घटनास्थळी मदतकार्यासाठी धाव घेतली. घटनास्थळी तसेच कॉटेज रुग्णालयात नागरिक पोलिसांना मदत करत आहेत. दरम्यान, काही सेवाभावी संघटनांनी जखमींना अल्पोपहार उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही शर्थीचे प्रयत्न -
या घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. जखमींची संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपूर्ण पडत असल्याने शिरपूर शहरातील खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील स्वेच्छेने उपचार केले.
स्फोटामुळे आजूबाजूचा 10 किमीचा परिसर हादरला -
हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या आवाजामुळे कारखान्याच्या परिसरातील आजूबाजूचा 10 किलोमीटर अंतराचा परिसर हादरला. मोठ्या आवाजाने आजूबाजूच्या गावातील नागरिक देखील भयभीत झाले.