धुळे - येथील रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुणे येथे जाणारी रेल्वे बोगी बंद करण्यात आली आहे. चांगले उत्पन्न मिळत असतानाही सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची यापुढे गैरसोय होणार आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत पत्र धुळे रेल्वे स्थानक प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाही.
शहरातून रोज कामानिमित्त व्यापारी, सरकारी कर्मचारी व सामान्य प्रवासी मुंबईसह तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून पुणे येथे जातात.अनेक प्रवासी एसटी महामंडळाची बस, खासगी बस व रेल्वेने प्रवास करतात. मात्र, बहुतांश प्रवासी रेल्वेला पसंती देत होते. आरामदायी सेवा व तुलनेने भाडेही कमी असल्याने धुळ्याहून रेल्वेने जाणाार्या प्रवाशांची संख्या अधिक होती. पण, आता धुळ्याहून चाळीसगावला जाणाार्या पॅसेंजरला मुंबई व पुण्यासाठी लावली जाणारी बोगी बंद करण्यात आली आहे. धुळे शहर मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेले आहे. मुंबईला मोठी बाजारपेठ असून मंत्रालयासह अनेक महत्त्वाची कार्यालय या ठिकाणी आहे. त्यामुळे शहराचा मुंबईशी नियमित संबंध आहे. या पॅसेंजर रेल्वेलाच मुंबईसाठी सायंकाळी तर पुण्यासाठी दुपारी बोगी जोडण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून ही सेवा नियमित सुरू होती. पण, रेल्वे प्रशासनाने या बोगी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्रवासी वर्गाला भुर्दंड
रेल्वेने प्रवास केल्यास तिकिटाचे दर परवडणारे होते. रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी सामान्य डब्यासाठी 250 तर पुण्याला 270 रुपये तर शयनयासाठी मुंबईला 650 आणि पुण्याला 750 रुपये तिकीट होते. तर बससाठी मुंबईला 500 पुण्यासाठी 600 ते 650 रुपये तिकीट आहे खासगी बससाठी एक हजार रुपयांपर्यंत आकारणी होते. त्यामुळे आता प्रवासी वर्गाला भुर्दंड बसणार आहे
अशी होती सुविधा
धुळे ते चाळीसगाव पॅसेंजरला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. धुळे रेल्वे स्थानकातून मुंबईला जाण्यासाठी चार बोगी व पुणे येथे जाण्यासाठी दोन बोगी पॅसेंजरला जोडण्यात येत होत्या. मुंबईला जाणाऱ्या चार बोगीमध्ये 144 शयन, 64 वातानुकुलीत शयन व सामान्य नव्वद सीट, अशी क्षमता होती. पुण्याला जाणाऱ्या दोन बोगीत वातानुकुलीत शयन 64, शयन 72, आसनांचा समावेश होता.
रेल्वेच्या उत्पन्नावरही होणार परिणाम
धुळे रेल्वे स्थानकातून मुंबई पुण्यासाठी स्वतंत्र बोगी जोडण्यात येते. त्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी वर्गाकडून 85 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. तर पुणे बोगीमुळे 67 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या बोगी रद्द झाल्याने याचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही होणार आहे.
हेही वाचा - विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे धरणे आंदोलन