धुळे - महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तांची अद्यापही पूर्णपणे मोजणी झालेली नाही. तर दुसरीकडे शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने मालमत्तांची संख्याही वाढत आहे. अनेकजण नवीन बांधकाम करतात, त्याची नोंद वसुली विभागात करत नाहीत. त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. ही गोष्ट लक्षात घेऊन धुळे शहरासह महापालिकेच्या हद्दीतील सर्व गावातील मालमत्तांचे जीपीएस आणि ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यावर मालमत्ताकर वसुलीतून सुमारे दहा कोटींचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.
मालमत्ता करात दहा टक्के वाढ अपेक्षित-
धुळे महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मालमत्ता करातून प्राप्त होते. शहराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विस्तार होत आहे. अनेक नागरिक जुने घर पाडून नवीन बांधकाम करतात. त्यांचे कर मूल्यनिर्धारण न झाल्याने कर आकारणी करता येत नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या मोजमापनानुसारच कराची आकारणी होते. अनेक ठिकाणी घरात दुकाने असतानाही संबंधितांकडून निवासी मालमत्ता कराची आकारणी होते. महापालिकेची हद्दवाढ झाली असून हद्द वाढतील गावांमध्ये अनेक वसाहती आहेत. या विषयाची परिपूर्ण नोंद महापालिकेच्या वसुली विभागाकडे नाही. त्यामुळे शहरात आवडीच्या क्षेत्रातील सर्व मालमत्तांची जीआयएस जीपीएस यांच्या मदतीने सर्वेक्षण होणार आहेत. प्रत्येक मालमत्तेचे छायाचित्र घेऊन मोजमाप करण्यात येईल. तसेच लेझरद्वारे व प्रत्यक्ष मालमत्तेची मोजणीही होईल. त्यानंतर नवीन डाटा तयार करून मालमत्ता करात दहा टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
शहरात आहेत 77 हजार मालमत्ताधारक -
शहरात सद्यस्थिती 77 हजार, तर हद्द वाढ गावात 19 हजार मालमत्ताधारक आहेत. अनेक भागात नव्याने घरांची निर्मिती झाली आहे. याविषयीची नोंद महापालिकेकडे नाही. मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी नागरिक येतात तेव्हाच मालमत्तेची नोंदणी होते. शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करून मोजमाप करण्यासाठी एका संस्थेला ठेका दिला होता. मात्र, कामात गैरव्यवहार झाल्याने हा ठेका रद्द करण्यात आला होता.
हेही वाचा - स्मरण दिन : 'केमिकल वॉर' म्हणजे काय? जगभरातील युद्ध पीडितांचं स्मरण