धुळे - महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर धुळ्यातील राजकीय क्षेत्रातील लोकांची झोप उडाली आहे. ज्या लोकप्रतिनिधीला भेटावयास गेलेल्या राजकीय क्षेत्रातील लोकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.
धुळे महानगर पालिकेतील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा गेल्या दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, हे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, त्याचा मृत्यू हा उच्चरक्तदाबामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी आणि नगरसेवकांनी संबंधित लोकप्रतिनिधीच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते.
मात्र संबंधित व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे समजल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेलेल्या राजकीय क्षेत्रातील लोकांना धक्का बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी आणि नगरसेवक हे होम क्वारंटाईन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही नगरसेवकांनी स्वतःची तपासणी केली असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.