धुळे - अवैध व्यवसायप्रकरणी अटकेत असलेल्या लाचखोर हवालदार छोटू बोरसे याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पोलीस दलातून निलंबन केले आहे. तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज गायकवाड यांची तडकाफडकी बदली केली आहे.
हेही वाचा - शिरपूर तालुक्यातून लाखाचे स्पिरीट जप्त
धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार छोटू बोरसे याने अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी छोटू बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. या घटनेनंतर पोलीस कर्मचारी छोटू बोरसे याचं पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पोलीस दलातून निलंबन केले स असून त्याच्या निलंबनासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक युवराज गायकवाड यांची पोलीस अधीक्षकांनी नियंत्रण कक्षेत तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी नियंत्रण शाखेतील पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांची नियुक्ती केली आहे. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात समाधान व्यक्त होत आहे.