धुळे - शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुळे एमआयडीसीमध्ये पाण्याच्या रिकाम्या टाक्या वादळाच्या वेगामुळे उडत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून वादळाची तीव्रता लक्षात येते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पहिल्याच पावसात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. धुळे एमआयडीसी भागात अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. या व्यावसायिकांनी कच्चा माल तसेच पक्का मालही कंपनीच्या आवारामध्ये ठेवला होता. परंतु, अचानक वादळ आल्याने या मालाचे नुकसान झाले. एका व्यावसायिकाने प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या, तसेच इतर उत्पादने कंपनीच्या आवारामध्ये ठेवले होते. वाऱ्याच्या वेगाने हा माल उडुन गेला. टाक्यांच्या प्रचंड वेगामुळे लोक जखमी होण्याचीही शक्यता होती.
टाक्या हवेत उडत असल्याचा हा व्हिडीओ आता सगळीकडे व्हायरल झाला आहे. उघड्यावर माल ठेवणे या व्यावसायिकाला महागात पडले आहे. गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारचे तुफान वादळ धुळेकरांनी कधीही अनुभवलेले नसल्याने या वादळामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते.