धुळे - गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शस्त्रची अवैधपणे विक्री सुरू असल्याच्या घटना रोज समोर येत आहेत. आज देखील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धुळे चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडाऊनसमोर गुप्तपणे गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे विकण्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. मोहाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.
चाळीसगाव रोड चौफुलीच्या दिशेने एका दुचाकीवरून एक तरुण सिमेंट गोडाऊनच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर, पोलिसांनी त्याची झाडाझडती केली. त्याच्याजवळ गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले.
तरुणाने हा गावठी कट्टा कुठून आणला व कोणाला देण्यासाठी आणला, या सर्व गोष्टींची मोहाडी पोलीस चौकशी करत आहेत. गावठी कट्ट्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता देखील पोलीस अधिकाऱ्यांना आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या 8 महिन्यात केलेल्या कारवाईतून आत्तापर्यंत 20 पिस्तूल जप्त केले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश या सीमेवरून हे बनावट आणि गावठी पिस्टल धुळ्यात येत असून पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.