धुळे - सध्या कोरोनाच्या संकटाचा परिणाम एसटीवर झाला असून एसटीच्या फेऱ्या अत्यंत कमी झाल्या आहेत, तर काही फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. अशा वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही या करीता प्रत्येक चालक-वाहक यांना आगारात हजेरीसाठी न बोलवता रोटेशनने स्वाक्षरीसाठी बोलावण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापकांनी दिले आहेत. मात्र या आदेशाला फाटा देत मध्यवर्ती आगारातील पर्यवेक्षकांनी चालक वाहकांना एकाच वेळेस स्वाक्षरीसाठी बोलावले. यामुळे रविवारी मध्यवर्ती आगारात मोठी गर्दी झाली होती. पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या बेफीकिरीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका बळावत आहे.
राज्यभर कोरोनाची दुसरी लाट अंत्यत गंभीर स्थितीत रुपांतरीत होत आहे. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्या दररोज नवनवीन उचांक गाठत आहे. यामुळे कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या विविध उपाय योजना म्हणून अंशत: लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे सध्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. बसफेऱ्या रद्द होत असल्यामुळे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या हातांना देखील काम नाही. दरम्यान एसटीची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. मात्र लॉकडाऊनमुळे एसटीची वाहतूक कमी अथवा बंद करावी लागली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या करीता प्रत्येक चालक-वाहक यांना आगारात हजेरीसाठी न बोलवता, ज्यांना ड्युटी देता येणार नाही. अशा चालक आणि वाहकांना तीन दिवसाच्या रोटेशननुसार तीन दिवसातून एक वेळेस आगारात बोलविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर एकादा कर्मचारी मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी येऊ शकत नसेल. तर त्या दिवसापासून प्रत्यक्ष कर्मचारी हजर होईपर्यंत त्याची रजा गृहीत धरण्याचे आदेश उपमहाव्यवस्थापकांनी आगार प्रमुखांना दिले आहेत. गर्दी कटाक्षाने टाळण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र या आदेशाला फाटा देत धुळे आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी दररोज चालक आणि वाहकांना स्वाक्षरीसाठी बोलावत आहेत. रविवारी सर्वच चालक आणि वाहक स्वाक्षरी करण्यासाठी दाखल झाले.एकाच वेळेस शंभर पेक्षा अधिक चालक आणि वाहक स्वाक्षरीसाठी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एकीकडे वरिष्ठ कार्यालयाने गर्दी न करण्याचे आदेश दिलेले असताना स्थानिक अधिकारी मात्र चालक आणि वाहकांना वेठीस धरत असल्याचे दिसून आले. वरिष्ठांच्या या बेफिकीरीमुळे कोरोनाला आयतेच निमंत्रण देण्यात येत असल्याचे दिसून आले.
![Order to sign ST employees once in three days](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-dhl-01-bus-gardi-mh10055_11042021160530_1104f_1618137330_1092.jpg)
कर्मचारी संघटनेचीही नाराजी -
उपमहाव्यवस्थापकांच्या आदेशानुसार जेवढी वाहतूक सुरू असेल तेवढेच कर्मचारी बोलाविण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांनी पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पर्यवेक्षकीय कर्मचारी चालक आणि वाहकांना रोज स्वाक्षरीसाठी या अन्यथा हजेरी भरली जाणार नाही, असे सांगत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वाक्षरीसाठी यावे लागते. ही बाब गंभीर असुन आजाराचा धोका आहे असल्याचे महाराष्ट्र कामगार संघटनेचे
विभागीय खजिनदार दिलीप राजपुत यांनी म्हटले आहे.
कर्मचारी चिंतेत -
शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत चालक आणि वाहकांना प्रत्यक्षात सेवा बजावता येत नसली तर फक्त स्वाक्षरी करण्यसाठी यावे लागत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार एकाच वेळेस स्वाक्षरी करण्यासाठी कर्मचारी यावे लागते. यामुळे संक्रमणाचा धोका आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही. तर कारवाईचा देखील धोका आहे. यामुळे दुहेरी चिंतेत असलेल्या चालक आणि वाहकांना नाईलाजास्तव स्वाक्षरी करण्यासाठी यावे लागत आहे.
..असे आहेत आदेश -
आगारात हजेरीसाठी सर्वांना एकाच वेळी न बोलवता टप्प्याटप्प्याने बोलविण्यात यावे. गर्दी होणार नाही व कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्यक्ष कामगिरी ही रोटेशनने प्रत्येकाला दिली जाईल, याची देखील दक्षता घेण्यात यावी. मुंबई बेस्टसाठी चालक -वाहक पाठवताना १५ दिवसासाठी पाठवणे आवश्यक असताना काही विभाग ७ दिवसात बदल करतात हे चुकीचे आहे. यापुढे १५ दिवसासाठीच चालक / वाहक व इतर कर्मचारी यांना पाठविण्याचे आदेश आहेत.