धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाने पुढील दीड दिवसांसाठी सक्तीचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी काढले आहेत. यादरम्यान बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील शिरपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंधवा येथे तसेच मालेगाव येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अद्याप धुळे जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दीड दिवसांसाठी सक्तीचा लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले असून, कलम 144 अंतर्गत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
यादरम्यान, अत्यावश्यक सुविधा वगळता हा संपूर्ण लॉकडाऊन सक्तीचा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.