धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथे काही वाळूमाफियांनी प्रांताधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्या वाळूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर येथील प्रांताधिकारी विक्रम बादल आज सकाळी आपल्या कार्यालयात जात होते. त्यावेळी शहरातील शहादा टी पॉईंट येथे त्यांना काही वाळू वाहतूकदारांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर प्रांताधिकारी विक्रम बादल मारहाण झालेल्या स्थितीत महसूल अधिकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरपूर येथे भेट दिली. त्यानंतर विक्रम बादल यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी योगेश राजपूत, सागर पाटील, रोहित पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर आणि शिंदखेडा उपविभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच विक्रम बादल यांना या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी मनःस्थिती ठीक नसल्याने बोलण्यास नकार दिला.