धुळे- राज्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कलम 144 लागू करण्यात आले. मात्र, धुळ्यात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. अन्यथा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा- CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री
कोरोनापासून बचावासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरातच बसून काळजी घ्यावी. असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये, यासाठी कलम 144 लागू करण्यात आले. मात्र, लोकांमध्ये कोरोनाबाबत गंभीरता नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही कायद्याचे उल्लंघन करत नागरिक घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे. अन्यथा पोलीस कठोर कारवाई करतील, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यानंतरही लोकांनी गंभीरता लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सोमवारी राज्यात संचारबंदी लावण्यात आली असून सर्व जिल्ह्यांच्या सीमाही सील केल्या आहेत.