धुळे : जिल्ह्यात आणखी ६० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आकडा १ हजार १४६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसोबत इतर आजरांनी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यादेखील सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आणखी ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार १४६ वर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत ६७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ४०० जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आणखी ४७६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून शिरपूर तालुक्यात आतापर्यंत ४११ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग 71.42 टक्क्यांवर गेला आहे. धुळे शहरासोबत ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये देखील वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढत असला तरीही नागरिकांकडून मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. यावर प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.