धुळे - पुरुष आणि महिलांमधील वादात गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे. या वादाचे कारणही मोठे चमत्कारीक आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे पुरुष संशयी बनत आहेत. यातून दोघात वाद झडत असल्याचे मत धुळ्यातील वकील अॅड. चंद्रकांत येशीराव यांनी व्यक्त केले. जागतिक पुरुष दिनानिमित्त ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
१९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुरुष दिन हा दिवस जगातील ७० देशांमध्ये साजरा केला जातो. त्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारतामध्ये २००७ साली सेव्ह इंडियन फॅमिली या संस्थेतर्फे जागतिक पुरुष दिन साजरा करण्याची पद्धत रूढ झाली.
हेही वाचा - पाच वर्षांची प्रतीक्षा संपली; आईला मिळाला तिचा गोलू
न्यायालयीन प्रक्रियेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर सक्षम कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र पुरुषांसाठी असे कोणतेही कायदे बनवण्यात आलेले नाहीत. धुळे जिल्हा न्यायालयात गेल्या वर्षभरात एकूण १४ पुरुषांच्या विविध प्रकरणांचा समावेश झालेला आहे. त्यातील सात प्रकरणांमध्ये पुरुष आणि महिला यांच्यात सामंजस्य घडवून आणण्यात आम्हाला यश आले आहे, अशी माहिती अॅड. येशीराव यांनी दिली.
पुरुषांच्या प्रकरणाची विविध कारणे समोर आली आहेत. त्यात व्यसनाधिनता, संशयी वृत्ती, यासोबत सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाईलचा अती वापर हेही कारण आहे. मोबाईलच्या अती प्रमाणात होणाऱ्या वापरामुळे पुरुष आणि महिला यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या संशयातून विविध प्रकरणे समोर आली आहेत. चंद्रकांत येशीराव हे गेल्या काही वर्षांपासून पुरुषांसाठी समुपदेशन केंद्र चालवीत आहेत.
हेही वाचा - शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको
पुरुषांना महिलांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. पुरुषांनी अशा विविध प्रकरणांमध्ये घाबरून न जाता समुपदेशनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.