धुळे - जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर ९ वरुन कमी होऊन ५ टक्के झाला असून धुळे जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ३७६ झाली असून आतापर्यंत ८८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४२८ जणांवर उपचार सुरू आहेत.
धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर हा कमी होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ९ टक्क्यांवर असलेला मृत्यूदर ५ टक्क्यांवर आला असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्टिंग लॅबमधील कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात वेळोवेळी साफसफाई केली जात नसल्याने तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने कर्मचारी कोरोनाबाधित झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा स्ट्रेन कोणता आहे? याबाबत पुणे येथील एनआयव्ही संस्थेला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. हा स्ट्रेन समजल्यावर उपचार करण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावे, तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.