धुळे : सध्या राज्यासह धुळे शहरात थंडीचे (severe cold) प्रमाण वाढत आहे. धुळे शहराचे तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यानं त्याचा जनजीवनावर परिणाम झाल्याचं युवासेनेनं म्हटलं आहे. थंडीचं प्रमाण वाढल्यानं सकाळी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना थंडीचा त्रास होत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खराब होत आहे. त्यांची हजर संख्या देखील कमी होत असल्यानं सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेत बदल (morning session of school held late) करण्यात यावा, अशी मागणी धुळे जिल्हा युवासेनेतर्फे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे (Yuva Sena demand to education authorities) करण्यात आली आहे.
थंडीचा कडाका आणि विद्यार्थ्यांना त्रास : शाळेच्या वेळेत काही तासांचा बदल केल्यास अनेक लहान बालकांना तसेच पालकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे थंडीमुळे लहान बालकांच्या प्रकृतीला निर्माण झालेला धोका टाळता येईल, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. धुळे शहरात बरेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ग्रामीण भागातुन शहरात शिक्षणासाठी दररोज येतात. एवढ्या कडाक्याच्या थंडीत, एवढ्या भल्या पहाटे कुठल्यातरी वाहनाने येणे म्हणजे कसोटीच. काही पालक तर मोटरसायकली वरुन पाल्यांना शाळेपर्यंत सोडायला येतात. सध्या अशा वातावरणात हे सर्व खुपच त्रासदायक असल्यानं या समस्यांवर गांभीर्याने विचार करुन, शाळांच्या वेळेत योग्य तो बदल करावा अशी मागणी युवा सेनेनं निवेदनाद्वारे केली आहे.
वाढलेल्या थंडीचा कडाका त्रासदायक : अचानक वाढलेल्या थंडीचा कडाका अबाल वृधांसह सगळ्यांना त्रासदायक ठरु लागला आहे. अनेक जण आजारी पडले आहेत. ज्यांना थंडीचा त्रास होतो, अश्या व्यक्तींना जास्त त्रास जाणवु लागला आहे. एकुणच या थंडीचा परिणाम सामान्य जनजीवनावर जाणवु लागला आहे. यामध्ये ज्या शाळकरी मुलांच्या शाळा व शिकवणी वर्ग सकाळी असतात, त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. शितलहरींमुळे अचानक तापमान कमी झाले असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाप्रमुखांची आश्वासक ग्वाही : सदर समस्येवर लवकरात लवकर कार्यवाही होईल अशी अपेक्षा यावेळी युवासेना सहसचिव यशवर्धन कदमबांडे, जिल्हाप्रमुख हरीष माळी यांनी व्यक्त केली. तसेच शिक्षणाधिकारी कार्यालय अधिक्षक गिरी यांनी या विषयावर ताबडतोब लक्ष देऊन निर्णय घेण्यात येईल, तसेच समस्त पालक वृंदाच्या समस्येचा उपाय काढण्यात येईल असे अश्वस्त केले. निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख हरीष माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, राज माळी, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, योगेश मराठे, राहुल धात्रक, मोहित वाघ, कृष्णा मांडे, सिद्धेश नाशिककर, गोपाल माळी, दर्शन खंबायत, दादू मराठे आदी युवासैनिक उपस्थित होते.