धुळे - शहरासह परिसरात वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला धुळेकर नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला असून व्यवसायिकांनी दुकाने कडकडीत बंद ठेवली आहे.
धुळे शहरासह परिसरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून शुक्रवारी (दि. 24 जुलै) तब्बल 127 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 419 कोरोना बाधित आढळून आले असून आत्तापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 656 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 670 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24 जुलै) दुपारी चार वाजल्यापासून ते सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.
या जनता कर्फ्यू ला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला असून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत. शहराच्या विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या जनता कर्फ्यूची महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान शहराच्या विविध भागातील मंजूर झालेली विकास कामे पूर्ण करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला असल्याचे चित्र देखील यावेळी पाहायला मिळाले. या जनता कर्फ्यू दरम्यान मेडिकल आणि दवाखाने वगळता अन्य सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.