धुळे - नागरिकत्व दुरुस्ती विधयेकायाला विरोध करीत या विधेयकाच्या निषेधार्थ अल्पसंख्यांक नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. हे विधेयक रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर संपूर्ण देशात विरोधाची लाट उसळली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क असलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या सी.ए.ए आणि एन.आर.सी प्रक्रिया रद्द करण्यात यावी. भारतीय संसदेत उभे राहून खोटी माहिती देऊन संपूर्ण देशाची दिशाभूल करणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि भारतात इतरत्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दडपशाही करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे विधेयक रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा - धक्कादायक..! धुळ्यात डाॅक्टर महिलेचा विनयभंग करून काढली धिंड