धुळे - शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांना सम आणि विषम तारखांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारपासून ही दुकाने उघडण्यात आल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. व्यावसायिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
हेही वाचा... फळांमध्ये बॉम्ब लपवून घेतात वन्यप्राण्यांचा जीव, गडचिरोलीत अतिशय क्रुरपद्धतीने होते शिकार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील अडीच ते तीन महिन्यांपासून धुळे व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन 5.0 मध्ये मात्र व्यावसायिकांना त्यांची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा व्यापारी संघटनेने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने व्यवसायिकांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. सम आणि विषम या तारखांना बाजारपेठेत अनुक्रमे दुकाने उघडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारपासून या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे.
शुक्रवारी वटपौर्णिमेचा सण असल्याने पूजेचे साहित्य, आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. धुळे जिल्ह्यात गुरुवारी रात्री तब्बल १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यातच व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास सांगितल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.