धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून 21 ऑगस्ट ऐवजी 22 ऑगस्टला ही यात्रा धुळ्यात येणार आहे. शहरातील कालिका माता मंदिर परिसरात मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे.
सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे 8 ऑगस्टला आयोजीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, ही यात्रा 21 ऑगस्टला धुळे शहरात येणार होती, मात्र आता ही यात्रा 1 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे 21 ऐवजी 22 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा धुळे दौऱ्यावर येणार आहे. शहरातील कालिका माता मंदिराजवळ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.