धुळे - शहरातील खुनी गणपती मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणेशाची स्थापना १८६५ साली स्वयंभू झालेली आहे. इंग्रजांच्या काळात १८९५ साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. तो सातत्याने चालू आहे. त्याला विशेष आणि वेगळी परंपरा आहे. जाणून घेऊया त्या परंपरेबद्दल -
'असे' पडले खुनी गणपती नाव -
सन १९०४ या वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती. यावेळी इंग्रजांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. त्यावेळी गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला, काही वेळातचे या भांडणाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी उपस्थिती ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला, ज्यामध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले. यावेळी धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरात खून होतात अशी समजूत रुढ झाली. या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचे ‘खुनी गणपती’ हे नाव पडले. यानंतर तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला.
या गणरायाची मौलाना करतात आरती -
खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघते, त्या मार्गात खुनी मशीद (शाही जामा मशीद) येते. या मशिदीजवळ गणरायाची मिरवणूक येते. त्यावेळी पूर्वीपासून शाही इमाम व मौलाना त्या मशिदीसमोर गणरायाची आरती करतात. गणपतीवर फुलांचा वर्षाव होतो आणि मिरवणूक मार्गस्थ होते.
विसर्जन मिरवणूक पाहण्याचे कुतूहल -
खुनी गणपती स्थापना झाल्यानंतर दर्शनासाठी तर अनेक भाविक येत असतात. परंतु विसर्जन मिरवणुकीत खुनी मशिदीजवळचे दृश्य बघण्यासाठी मोठ्याने प्रमाणात गर्दी झालेली असते.
हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक खुनी गणपती -
ब्रिटिशांच्या राजकारणातून येथे दोन समाजात तेढ निर्माण करण्यात आला होता. त्यात काही लोक मरण पावले होते. ते सर्व ब्रिटिशांच्या गोळीबारात ठार झाले होते त्यानंतर दोघे समाजात ऐक्य घडून आनले व दोन समाजानी मिळून मिसळून या गणरायाची स्थापना व विसर्जन करावे, असे ठरवण्यात आले.
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास