धुळे - मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्वर आणि सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यास धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुमार कोळी यांचे हे रिव्हॉल्व्हर होते. या रिव्हॉल्व्हरसह त्यात वापरण्यात येणारे राऊंडस आणि सोन्याच्या दागिन्यांचीही चोरी झाली होती.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी धुळ्यात आले होते. त्यांच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच, भावालाही कोरोनाची लक्षणे दिसत होती. यामुळे कोळी 15 दिवसांची रजा काढून धुळे शहरात आले होते. ते किरण सोसायटी झेंडा चौक जवळ देवपूर या ठिकाणी राहात होते. 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून बॅगमध्ये ठेवलेले एक 50 हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाचे सर्विस रिव्हॉल्वर आणि तीनशे रुपये किमतीच्या राऊंडस तसेच, 25 हजारांचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी असा एकूण 1 लाख 76 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
हेही वाचा - युपी सामूहिक अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज अयशस्वी; दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडे दिला गेला. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे गतिमान करीत एका संशयितास अटक पकडले आहे. त्याच्या ताब्यातून पोलीस कर्मचाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
सर्व्हिस रिव्हॉल्व्हर सापडल्याने मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून अवघ्या काही तासांत चोरट्याला जेरबंद करण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा - सासरा-मेव्हण्याने केली जावयाची हत्या; कुऱ्हाडीने घाव घालून संपवले जीवन