धुळे - घराला लागलेल्या आगीत 60 वर्षीय वृद्ध महिलेसह चार पशूंचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला गावात घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, आगीत होरपळून जीवितहानी झाली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात, तीन जणांचा मृत्यू
नागेश्वर बंगला गावातील नवशीबाई बापू चव्हाण या ६० वर्षीय वृद्धेच्या घराजवळ गुरांसाठी असलेल्या चाऱ्याला आग लागली. वाऱ्यामुळे आग आणखी पसरली. परिणामी आगीच्या ज्वाळा घराच्या दारापर्यंत पोहचल्याने घरात असलेल्या नवशीबाई बापू चव्हाण यांना घराबाहेर निघता आले नाही. नवशीबाई यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. चाऱ्याच्या गंजी जवळ असलेले चार पशूंचा देखील आगीमुळे मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी प्रथम ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केलेत. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळाले. आगी कशी लागली, हे कळू शकले नाही.
हेही वाचा - धुळे पोलिसांची मोठी कारवाई; एसयूव्हीमधून जप्त केल्या 90 तलवारी, 4 जणांना अटक