धुळे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली धुळ्यातील संदेश भूमीची जागा कौटुंबिक न्यायालयाला देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. यामुळे प्रशासन आणि संदेश भूमी कृती समिती यांच्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी संदेश भूमी कृती समितीने केली आहे.
राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 31 जुलै 1937 रोजी कोर्टाच्या कामानिमित्त धुळे शहरात आले होते. यावेळी, शहरातील बसस्थानक परिसरातील ट्रॅव्हल्स बंगला येथे बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्काम होता. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी मागणी संदेश भूमी कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे करण्यात येत आहे.
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेचा विविध संदर्भ ग्रंथ तसेच दस्तऐवजांमध्ये उल्लेख आढळतो. मात्र, याठिकाणी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचे कौटुंबिक न्यायालय उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यासंबंधीचे पत्र संदेश भूमी कृती समितीला प्राप्त झाले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला संदेश भूमी कृती समितीने विरोध केला असून, या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय उभारू न देतात ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी मागणी केली जात आहे.
कौटुंबिक न्यायालयाच्या या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून संदेश कमी कृती समिती आणि प्रशासनामध्ये वाद सुरू झाला आहे. याठिकाणी राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, अशा आशयाचे पत्र सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देखील शासनाला देण्यात आलेले आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या जागेवर कौटुंबिक न्यायालय उभारले गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संदेश भूमी कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे यांनी दिला आहे.
हेही वाचा - कोरोनामुक्त होणाऱ्या जिल्ह्याच्या यादीत धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर