धुळे - शिरूड गावातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैध दारू जप्त केली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे संबंधित कारवाई करण्यात आली आहे. धुळे तालुक्यात शिरुड या गावात पारोळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका शेतात दारूविक्री सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सोमनाथ पाटील याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे अन्य दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
चाऱ्याखाली लपवल्या बाटल्या
पोलिसांनी शेतात जाऊन कारवाई केल्यानंतर त्यांना 750 मिली बाटल्यांचे एकूण सात बॉक्स सापडले. संबंधित मालाची किंमत 50 हजार 400 रुपये असून याप्रकरणी सोमनाथ रमेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याचे साथीदार दिनेश निंबा गायकवाड, सोपान रवींद्र परदेशी हे फरार झाले आहेत. संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.