धुळे - कुसुम्बा येथील भटक्या-विमुक्तांवर कोरोना आजारामुळे उपासमारीची वेळ आली आहे. गावात ग्रामस्थ येऊ देत नसल्याने आम्हाला तेथे राहणे कठीण झाल्याचे या नागरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. प्रशासनाने आमची दखल घेऊन धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही या भटक्या-विमुक्तांनी केली आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्य व देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा फटका सर्व स्तरातील लोकांना बसत आहे. यात गोरगरीब आणि मोलमजुरी करणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. यामुळे या लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. सुरत, नागपूर महामार्गावरील कुसुंबा गावात वास्तव्यास असणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना देखील याचा फटका बसत आहे. विविध गावांमध्ये स्थलांतर करणारी ही कुटुंबे सध्या कुसुंबा या गावात वास्तव्यास आहेत. गावाच्या ओसाड जागेवर झोपड्या बांधून ही कुटुंबे राहत आहेत. घरात वापरला जाणारा पाटा-वरवंटा तसेच मूर्ती घडविण्याचे काम हे नागरिक करतात. या लोकांवर कोरोना आजारामुळे उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने पैसे देखील मिळत नाहीत.
या आजाराच्या संसर्गामुळे ग्रामस्थ गावात येऊ देत नसल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. आम्ही येथील मूळ रहिवासी नसल्याने आम्हाला रेशनचे धान्य मिळत नाही. यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया या भटक्या विमुक्तांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. एकीकडे शासनाने रेशन धान्य सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याचे बोलले जाते आहे. तरी देखील या कुटुंबांना रेशन मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याची दखल घेऊन या कुटुंबांना धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.