धुळे - जिल्ह्यात शनिवारी सुमारे २० दिवसानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश नदी-नाल्यांना पूर आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एकूण १८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शनिवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळला. यामुळे रोहिणी, बुराई, केसर आदी नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरिपाचे पीक धोक्यात आले होते. आणखी काही दिवस पाऊस आला नसता तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असती. मात्र, शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरिपाच्या पिकांची चिंता काही दिवसांसाठी मिटलेली आहे.
दरम्यान, अचानक आलेल्या या वादळी पावसाने काही भागात मोठे नुकसानही झाले आहे. शनिवारी रात्री वीज कोसळल्याने जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू झाला तर इतर एका घटनेत दोन गुरेही दगावली होती.