धुळे - साक्री पिंपळनेर परिसरात रात्रभर पावसाचा जोर सुरू होता. त्यामुळे रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे कान नदीला पूर आला आहे. साक्री पिंपळनेर रोडवरील जुना लहान पूल व साक्री-भाडणे गावाला जोडणारे पूल दोन्ही पाण्याखाली गेले आहेत.
नदिलगत असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली असून रविवारी देखील सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या सुरू असलेल्या पावसामुळे साक्री तालुक्यात धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच नद्यांना देखील पूर आला आहे. तसेच साक्री तालुक्याला पाणी पुरवठा करणारे लाटीपाडा धरण ओवरफ्लो झाले आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.