धुळे: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसाल्याची इतर राज्यांमधून तस्करी होत आहे. कायद्याने बंदी असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने आणला जात असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६ जून रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की, इंदूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून (क्रमांक एम. एच. १८ बीजी ३३०२) गुटख्याची वाहतूक होत आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नरडाणा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल अन्नपूर्णाजवळ आयशर ट्रक येताना दिसल्याने त्यास थांबविण्यात आले.
चौकशीत आढळला गुटखा: पोलीस चौकशी दरम्यान ट्रक चालकाने त्याचे नाव सदाशिव रामचंद्र राठोड (३५, रा. महू जी. इंदूर,मध्यप्रदेश) असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव सिकंदर कैलास सोनगरा (४५, रा. हरसोला, ता. महू जी. इंदूर) असे सांगितले. त्यांना ट्रकमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ट्रकमधील मालाची खात्री केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला मिळून आला.
या पथकाने केली कारवाई: ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक योगेश राऊत, हेड कॉन्स्टेबल प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, पोलीस नाईक कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, कॉन्स्टेबल राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी, योगेश साळवे यांनी केली.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक? : गुटख्याची मोठी तस्करी पोलिसांनी रोखली आहे. गुटखा तस्कर जिल्ह्यात किती सक्रिय आहेत, हे यावरून दिसून येते. पोलीस विभागाने दक्षतेने कारवाई केल्याने गुटखा तस्करांचे कंबरडे मोडले आहेत. गुटखाविरोधी कारवाई आणखी तीव्र केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
हेही वाचा: