धळे- इंदूर मर्गावर मालेगावकडे जाणाऱ्या एका आयशर गाडीतून सुमारे 21 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी चाळीसगाव रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर अवैध पान मसाला व तंबाखू घेऊन जात असलेला आयशर चौफुली मार्गे जाणार असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्ग 3 वरील चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचला होता. या मार्गाने जाणाऱ्या आयशर वाहनांची तपासणी केली असता यातील एकात 19 लाख 80 हजार रुपये किमतीचा पान मसाला भरलेल्या पन्नास गोण्या तसेच 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा तंबाखू भरलेल्या पन्नास गोण्या, 8 लाख रुपये किमतीची आयशर गाडी, असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी गाडी चालक रवी परबत खरते आणि वाहक परबत नथू वास्कले या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेला मुद्देमाल औषध व अन्न प्रशासन विभाग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.