धुळे - पांझरा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच काही ठिकाणी नुकसानही झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
धुळे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा पांझरा नदी पात्रात रविवारी विसर्ग करण्यात आला. जवळपास 40 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तब्बल बारा वर्षांनी पांझरा नदीला पूर आल्याने शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नदीला आलेल्या पुराबाबत तसेच विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पूरसदृश्य परिस्थिती पाहता विविध विभागांनी सतर्क राहणे आवश्यक असून नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी त्वरित उपाय योजना कराव्यात, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.