धुळे - जिल्ह्यातील साक्री शहरातील सावित्रीबाई मुलींचे शासकीय आदिवासी निवासी वसतिगृहातील टॉयलेटमध्ये एका १८ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रवी पाडवी या तरुणाविरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित मुलगी ही बी. ए. पहिल्या वर्षामध्ये शिकत होती. तिने टॉयलेटमध्ये बाळाला जन्म देऊन बाळ तिथेच बादलीमध्ये सोडून दिले. त्यानंतर ती मुलींमध्ये येऊन झोपी गेली. बाळाचा आवाज येताच वसतिगृहाच्या वार्डनने बाळाच्या दिशेने धाव घेतली असता, बादलीत बाळ पालथे पडलेले आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कोणीही समोर यायला तयार नव्हते. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित मुलीला आरोग्य तपासणीसाठी नेले असता, हे बाळ तिचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, मुलीने बाळाला जन्म देतपर्यंत ही बाब वसतिगृह प्रशासनाच्या लक्षात आली नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच या मुलीची साक्री शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुलीच्या रिपोर्टमध्ये काहीही दाखवले नव्हते. आता दोन महिन्यांनंतरच या मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. यामधून शासकीय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. याबाबत निवासी वसतीगृहातील वरिष्ठांवर देखील संशय बळावला असून याबाबतची कमालीची गुप्तता वसतिगृह प्रशासनाकडून बाळगली जात आहे.
सध्या बाळ व बाळंतीण दोघांनाही पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रवी पाडवी या तरुणाविरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तापस साक्री पोलीस करीत आहेत.