धुळे - जिल्ह्यातील नरडाणा येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज तार चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत चोरीस गेलेल्या तारांसह अन्य साहित्यासह सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीज तारा चोरीला जाण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून वाढल्या होत्या. नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विविध भागात या घटना घडत होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी माळीच गोराणे शिवारातून एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्ब्ल ११ पोलवरील सुमारे २ हजार मीटर लांबीची अल्युमिनियम तार एका रात्रीतून चोरटयांनी चोरून नेली होती. या चोरीत स्थानिक चोरट्यांचा हात असावा, असा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे माहिती घेतली. या माहितीत प्रवासी वाहतूक करणारा मिनीडोअर चालक देवा नाना बागुल याचे नाव समोर आले. देवा बागुल हा आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी करत होता. पोलिसांनी सापळा रचून देवा बागुल याला चोरीच्या मालासह ताब्यात घेतले.
यावेळी त्याने यात सहभागी असणाऱ्या भंगार व्यापाऱ्याचेही नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी किशोर शेण्या भिल, राजेंद्र उर्फ राजू ज्योतीराम अहिरे या दोघा साथीदारांसह शिरपूरचा भंगार व्यापारी फिरोज शहा दगू शहा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून पोलिसांनी चोरी केलेल्या सुमारे २४५ किलो अल्युमिनियम तारेसह गुन्ह्यात वापरलेली ऍपेरिक्षा जप्त केली आहे. यात पोलिसांनी सुमारे १ लाख, १ हजार ,९१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईत तार चोरीचे ४ गुन्हे आणि ट्रॅक्टर चोरीचा १ गुन्हा असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.