धुळे - शिंदखेडा तालुक्यातील वनक्षेत्रपाल किरण माने याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने अटक केली. शिस्तभंगाची कारवाई रोखण्यासाठी त्यानी तक्रारदाराकडे 2 लाखांची मागणी केली होती. या लाचेचा पहिला 25 हजारांचा हप्ता स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी किरण माने याला रंगेहाथ अटक केली आहे.
हेही वाचा... मुंबईच्या तरुणाने तब्बल 46 हजार 80 प्लास्टिक मण्यांपासून बनवली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
वन विभागात कार्यरत असलेल्या एका 46 वर्षे तक्रारदाराने बोगस प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी किरण माने यांनी त्याला शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली होती. परंतु, या नोटीसीनंतर तक्रारदार यांच्याकडे शिस्तभंगाची कारवाई न करण्यासाठी वनक्षेत्रपाल किरण माने यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याच लाचेचा 25 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना आरोपी किरण मानेला रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे आणि त्यांच्या पथकाने केली.