धुळे - संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. थंडीत वाढ झाल्याने या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत आहेत. दिवाळीनंतर संपूर्ण राज्यात थंडीने हुडहुडी भरली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून नीचांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात तापमान सहा अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. तर, नंदुरबार सातपुडा परिसरात चार अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
शेकोट्या पेटल्या, गरम कपडे घालून नागरिकांचा मॉर्निग-वॉक...
कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत. शिवाय सकाळी आणि सायंकाळनंतर घराबाहेर पडताना गरम कपडे घालने बंधनकारक झाले आहे. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गरम कपडे, कानटोपी, मफलर घालूनच बाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, गुलाबी थंडीचा आनंद घेत फिरणाऱ्यांची आणि सायकलिंग करणाऱ्यांची संख्या देखील वाढली.
'या' ठिकाणीही घसरला पारा -
धुळ्याव्यतिरिक्त जळगाव 11 अंश सेल्सिअस, बीड 12 अंश सेल्सिअस, रायगड 18 अंश सेल्सिअस, गोंदिया 9 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 10 अंश सेल्सिअस, नाशिक 8.4 अंश सेल्सियस, निफाड 6.5 अंश सेल्सिअस, ठाणे 21, अमरावती 15 लातूर 15, बुलढाणा 15 अंश सेल्सिअस या ठिकाणी तापमानात मोठी घट झाली आहे. सातपुडा परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यातील विहंगम दृश्य कॅमेरात कैद करण्यासाठी पर्यटकांनी विविध पर्यटन स्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ -
थंडीमध्ये झालेली वाढ बघता उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याने वयोवृद्ध नागरिकांची आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.