धुळे - तालुक्यातील निमगूळ येथील प्राची माळी या बालिकेच्या मारेकऱ्यांचा शोध लावून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या मागणीसाठी माळी समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
धुळे तालुक्यातील निमगुळ गाव शिवारातील प्रवीण रामराव सैंदाणे (माळी, वय २९) यांची मुलगी प्राची ही नवरात्री काळात बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शेतालगत एका विहिरीत आढळला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. प्राचीच्या मारेकऱ्याचा शोध घेऊन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या मागणीसाठी माळी समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
समाजातून व्यक्त होतोय रोष..
प्राची माळी या बालिकेचा मृत्यू होऊन वीस दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. मारेकऱ्यांचे नाव सांगणाऱ्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने २५ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तरीही पोलिसांना कुठलाही तपास लावण्यात यश आलेला नाही.
हेही वाचा- धुळे : पिस्तुल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत