धुळे - जिल्हा परिषदेतील 700 रुपयांची लाच मागणाऱ्या महिला लेखापालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी ही लाच महिला लेखापालाने मागितली होती. संगीता शिंपी, असे या महिला लेखापालाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार निवृत्त झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसार मिळत असलेली रक्कम मिळवून देण्यासाठी शिंपी यांनी 934 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तक्रारदाराने शेवटी 700 रुपये देण्याचे निश्चित केल्यानंतर याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली.
त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून महिला लेखापाल संगिता शिंपी यांना 700 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. दरम्यान, लाचलुचपत विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर जिल्हा परिषद विभागात एकच खळबळ उडाली आहे.