धुळे: याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. मोराणे गावाच्या शिवारात संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाच्या समोर एका बंद घरामध्ये काही संशयित इसम बेकायदेशीररित्या बनावट आणि विषारी दारू तयार करीत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. त्यानुसार धुळे तालुका पोलिसांनी या घरावर 8 मे रोजी रात्री उशिरा छापा मारला. त्यावेळी त्या घरामध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य निदर्शनास आले.
'या' आरोपींना अटक: या प्रकरणी पोलिसांनी मलिंदरसिंग गुरुमुखसिंग शिकलकर (वय २७ वर्षे, रा. यशवंतनगर, धुळे), रमेश गोविंदा गायकवाड (वय ४५ वर्षे, रा. चितोड भिलाटी ता. धुळे) आणि भिलु भिवराज साळवे (वय ३० वर्षे, रा. यशवंतनगर, धुळे) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ६४ हजार ८०० रुपये किमतीची बनावट विषारी दारू जप्त केली. तसेच पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, वीस हजार रूपये किमतीची एक दुचाकी आणि ९१४ रुपये किमतीचा इतर मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई विषयी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी अधिक माहिती दिली.
'या' पोलिसांचा कारवाईत सहभाग: ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, विजय जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील विंचुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ यांच्या पथकाने केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी धुळे तालुका पोलिसांचे कौतुक केले