धुळे - विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतमोजणी होणार आहे. मात्र, या मतमोजणीपूर्वी मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते, असा संशय काही नेते वर्तवित आहेत. याच संशयातून अनिल गोटे यांनी गेल्या दोन दिवसांपासून मतमोजणी केंद्राच्या परिसरात रात्रभर पहारा दिला आहे.
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे हे विविध कारणांनी नेहमी चर्चेत राहतात. मात्र यावेळी अनिल गोटे मतदान यंत्राला पहारा देण्याच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. गोटे यांनी मतमोजणी केंद्रात झोप घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गोटे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेदेखील रात्रभर या ठिकाणी पहारा देत आहेत. विधानसभेचा जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र हा निकाल अनिल गोटे यांच्या मनाविरुद्ध लागल्यास ते पुढील काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.