धुळे - आजच्या धकाधकीच्या जीवनातून मुलांसाठी वडिलांनी वेळ काढलाच पाहिजे, कारण मुलांसाठी त्यांचे वडील हे खरे हिरो असतात. यासाठी येणारा प्रत्येक दिवस हा फादर्स डे असायला हवा. तसेच मुलांवर संस्कार करण्याची सगळी जबाबदारी आईवर न सोपवता वडिलांनीदेखील ती जबाबदारी घ्यावी, असे मत धुळे जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले. दरवर्षी २१ जूनला साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक पितृ दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
डॉक्टर पाटील यांना 2 मुली आहेत. ते नेहमी आपल्या मुलींसाठी एक वडील म्हणून आवश्यक तेवढा वेळ त्यांना देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्या कोरोना सारख्या महामारीचे राज्यावर संकट घोंगावत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि वडील अश्या 2 पातळ्यांवर काम करणारे डॉ. पाटील यांनी कामाच्या व्यापात सध्या मुलींना वेळ देणं शक्य होत नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र घरी आल्यावर जो वेळ मिळेल तो मुलींसोबत घालवतो. त्यांचा अभ्यास असेल किंवा त्यांच्यासोबत खेळणं असेल अश्या पद्धतीने त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पितृ दिनाच्या पार्श्वभूमीवर वडील आणि मुले यांच्या नातेसंबंधाबाबत डॉ. पाटील यांनी काही मतं व्यक्त केली. पाटील म्हणाले, आज विविध डे साजरे करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र असे डे साजरे करण्याची गरज का पडते? येणारा प्रत्येक दिवस हा फादर डे असायला हवा, वडील म्हणून भूमिका पार पडताना त्यांनी मुलांशी संवाद साधायला हवा, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी त्यांच्याशी शेयर करायला हव्यात. त्यातून मुलांची मते जाणून घ्यायला हवीत, मुलांचं भावविश्व घडविण्यासाठी वडिलांनी महत्वाची भूमिका पार पडायला हवीत
मुलांसाठी त्यांचे वडील हिरो असले पाहिजेत, त्यांच्यापुढे एक आदर्श निर्माण केला पाहिजे असे मतही यावेळी डॉ. विशाल पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलं.