धुळे: मुंबई- आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी येथे तालुका पोलिसांच्या पथकाने मानवी मेंदूवर परिणाम करणार्या अफुची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग करून ३३१ किलो अफू जप्त केला. मात्र या कारवाईत कारचालक पसार झालाय. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सदरची कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.
अशी झाली कारवाई धुळे तालुक्यातील आर्वी याठिकाणी १८ ऑक्टोबरच्या रोजी सायंकाळी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी हे पेट्रोलींग करत असतांना साधारण सायंकाळच्या 5:15 वाजेच्या सुमारास धुळ्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या जीजे ०१ आर पी १२८१ या महिंद्रा कंपनीच्या एक्सयुव्ही कारबाबत पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग करून वाहन चालकाला वाहन थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन रस्त्याचे कडेला थांबवून तो गाडीतून उतरून पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो पोलिसांना गवसला नाही. त्यानंतर संशयित वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता. त्यात १८ प्लॅस्टिकच्या गोण्यात अफुच्या बोंडाचा तुकड्यांचा चुरा भरलेला आढळून आला. एकुण ९ लाख ९३ हजार १८० रूपये किंमतीचा ३३१ किलो अफुच्या बोंडाचा तुकड्यांचा चुरा तसेच ८ लाखाची कार असा एकुण १७ लाख ९३ हजार १८० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत सुरु आहे चर्चा अफूची तस्करी करणारे वाहन पोलिसांनी पकडले. मात्र या वाहनाचा चालक वाहनातून उतरून पोलिसांसमोर पसार होतो. ज्यावेळी कारवाई झाली, त्यावेळी त्याठिकाणी पोलिसांचं वाहन, किमान ४-५ पोलीस तर असतील ना ? मग असे असतांना मादक पदार्ध वाहतूक करणारा गुन्हेगार पसार झालाच कसा ? याबाबत मात्र आर्वी परिसरात चर्चा सुरु आहे.
अफू तस्करी प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल अफू तस्करी प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरक्षक प्रकाश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलायं. सदरची कामगिरी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर काळे, असई सुनिल विंचूरकर, पोहेकॉ प्रविण पाटील, किशोर खैरनार, पोकाँ नितीन दिवसे, अमोल कापसे यांच्या पथकाने केली आहे.