धुळे - शहरातील सार्वजनिक रुग्णालयाजवळ असलेल्या एका कपड्याच्या पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी एकूण २५ तलवारी जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यातील मुख्य आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळाली होती गुप्त माहिती -
सार्वजनिक रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या कापड दुकानात मोठ्या प्रमाणात तलवारींची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून धुळे पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास दुकानावर अचानक छापा टाकला. चौकशी व तपासणी केली असता कपड्याच्या पिशवीमध्ये 19 तलवारी आढळून आल्या. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.
आणखी आरोपींना घेतले ताब्यात -
याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आणखी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी तलवारी कुठून आणल्या आणि कुठे विक्री केली जाणार होती, याची चौकशी करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आतापर्यंत 6 तलवारींची विक्री केल्याचे उघड झाले. त्या तलवारीही पोलिसांनी मिळवल्या आहेत. या कारवाईत एकूण २३ मोठ्या व दोन लहान तलवारी, चाकू, चॉपर असा ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत , कर्मचारी प्रेमराज पाटील , अजीज शेख , भुरा पाटील , सुशील शेंडे यांनी केली. प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात जावून सकाळी या तलवारींची पाहणी केली.