धुळे - डॉ. सुभाष भामरे हे खासदार झाले, मात्र गेल्या ५ वर्षात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव नाही. त्यांनी आपला दवाखाना सांभाळावा, आम्ही धुळे लोकसभा मतदारसंघ सांभाळू, असा टोला काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी लगावला. धुळ्यात आयोजित काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील हिरे भवन येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला धुळे ग्रामीणचे आमदार तथा लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे तालुक्यातील जनतेने कुणाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आता प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे.