धुळे - राज्यातील २६ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मंगळवारी सायंकाळी बदल्या करण्यात आल्या. यात धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची औरंगाबाद येथे बदली झाली आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाधरन यांची धुळे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रेखावार यांची औरंगाबाद येथे महावितरणाच्या सह संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाधरन यांची धुळे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर वामंती सी यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रेखावार यांची संपूर्ण जिल्ह्यात एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर धुळे महानगर पालिकेच्या आयुक्तपदाची देखील जबाबदारी सोपविण्यात आली होती. रेखावार यांच्या बदलीने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये धुळे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी अद्यापही कुणाची वर्णी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.